गर्लफ्रेंड कल्चरचा ‘खेळ’!

    दिनांक :15-May-2026
Total Views |
वेध
रेवती जोशी-अंधारे
Girlfriend Culture'  ‘जेण्टलमन्स गेम’ म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटचा खेळ सध्या भलत्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. मैदानावर बॅट आणि बॉलच्या सामान्यातील रंगत फिकी पडून, पॅव्हेलियनमधील दृश्ये ‘रसभरीत’ ठरू लागली आहे. किमान यंदाचा आयपीएल सिझन तरी एवढ्याचसाठी आणि विशेषत्वाने ‘गर्लफ्रेंड कल्चर’साठी लक्षात राहणार आहे. कॅमेऱ्यासमोर जे दिसतंय त्यापेक्षा कितीतरी जास्त कॅमेऱ्यामागे खरोखर घडतंय आणि हे सगळं इतकं गंभीर आहे की, नियामक मंडळाला त्यासाठी धोरण आखण्याची गरज भासते आहे.
 
 
Cricket
 
क्रिकेटचा खेळ भारतीयांसाठी केवळ मनोरंजन नाही तर प्रत्येक युवा पिढी घडविणारा एक धर्म आहे. प्रश्न खेळभावनेचा तर आहेच; सोबतच खेळातील नीतिमूल्यांचा आणि संयमाचा आहे. आज लहानशी दिसणारी ही समस्या वास्तवात हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारापासून सुरू झालेलं हे प्रकरण पॅव्हेलियनमध्ये बसून वेपिंग करण्यापर्यंत गेलं आहे. मालिकेदरम्यान, पत्नी किंवा अगदी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला खेळाडूसोबत हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी होती. पण, अलिकडे खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचे प्रस्थ वाढलेले दिसू लागले. मैदानावर खेळाडूंना घेऊन जाणारी बस या गर्लफ्रेंड्ससाठी थांबू लागली, आयपीएलच्या संपूर्ण प्रक्रियेतील गोपनीयता चव्हाट्यावर येऊ लागली. बहुतांश ‘गर्लफ्रेंड्स’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे स्टेडियमच्या आत-बाहेरचं सगळंच रील्समध्ये झळकू लागलं. विशेषत: हार्दिक पांड्याच्या प्रकरणानंतर हे विशेषत्वाने उघड झालं. आयपीएलपूर्वी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाची चर्चा झालीच.
 
 
'Girlfriend Culture' गर्लफ्रेंड्स सोबत मिरवण्यामुळे संघशिस्तीचा भंग, खेळामध्ये एकाग्रता नसणे आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन वारंवार घडू लागलं आणि यातून ‘गर्लफ्रेंड कल्चर’चा उदय झाला. युवापिढीसाठी ‘रोल मॉडेल’ असणारे खेळाडू सामना सुरू असताना, कॅमेऱ्यांसमोर ई-सिगारेट ओढून वेपिंग करत असतील, तर चाहते म्हणून आपल्यालाच क्रिकेटचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही खेळाडूसाठी शिस्त हा दागिना असावा, ओझं नाही. डग आऊटमध्ये बसून किंवा व्लॉग्ज्मध्ये, खेळाविषयीच्या चर्चेपेक्षा नशेच्या धुराची वलयं दिसत असतील तर हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर, कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाची उघडउघड केलेली हत्या आहे. क्रिकेटचे मैदान पब किंवा क्लब नाही की, खेळाडू तिथे बसून नशा करतील. मैदान तर खेळाडूंच्या घामाच्या थेंबांची शाई करून इतिहास लिहिण्यासाठी आहे. कॅमेऱ्यासमोर नशेडी क्रिकेटपटूंना बघणाऱ्या लोकांच्या मनात साहजिकच प्रश्न येतो की, कॅमेऱ्यासमोर हे असं आहे तर मागे काय सुरू असेल?
 
 
‘नो गर्लफ्रेंड’ आणि नशा रोखण्यासाठी कठोर सुरक्षा यंत्रणा लावणाऱ्या बीसीसीआयला आज कोणी बुरसटलेल्या विचारांचे म्हणत असले, तरी क्रिकेटला सोशल मीडियाचा ‘कंटेंन्ट’ बनविण्यापासून रोखण्यासाठी अशी कार्यवाही आवश्यक आहे. या सगळ्या गोंधळात आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रीडा पत्रकारांवरही ठपका ठेवला गेला. पण, यथावकाश ट्विट डिलीट झाल्या आणि बदलल्याही गेल्या. खेळभावनेतून जय-पराजय स्वीकारावा, हे तर क्रीडातंत्राचे मूळ आहे. आताशा लोकतंत्रातही पराभव स्वीकारून पद सोडणे, किती कठीण आहे हे आपण पश्चिम बंगालमध्ये बघत आहोतच. पैसा आणि यश डोक्यात जाणार असेल तर आयपीएलच्या सगळ्या युवा खेळाडूंनी थोडं थांबून विचार करण्याची आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या भारतीय क्रिकेटच्या धुरंधरांच्या ‘लीगसी’कडे वळून बघण्याची गरज आहे. आयपीएलची खरी ताकद त्यात असलेल्या पैसा आणि ग्लॅमरच फक्त नाही तर लोकांचे प्रेम आहे. क्रिकेटचा तो खेळ आहे ज्याने गल्लीबोळांपासून भव्य स्टेडियमपर्यंत भारतीयांची मनं जोडली आहेत.
 
 
Girlfriend Culture'  क्रिकेट म्हणजे निर्जीव व्हिडीओ गेम नाही. त्यातील थरार, जिंकण्याची धडपड, पराभवानंतरचा मोकळेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘हिरो’ म्हणून असलेली खेळाडूंची प्रतिमा क्रिकेटधर्मीयांना हवी आहे. आयपीएलची व्ह्युअरशिप घसरण्यामागे हेदेखील एक कारण आहे. आयपीएलचे ग्लॅमर, खेळाडूंचा ‘सेलिब्रिटी’ बनण्याचा झटपट झालेला प्रवास, सुमार परफॉर्मन्समध्येच हाती खेळणारा पैसा आणि त्यातून आलेला वैयक्तिक अहंकार ‘इतिहास’ घडवू शकणार नाही. क्रिकेटचा आत्मा वाचविण्यासाठी खेळाडूंना शिस्त आणि संयम बाळगून ‘गर्लफ्रेंड कल्चर’मधून बाहेर पडावं लागेल. ब्रॅण्ड व्हॅल्यू, स्पॉन्सरर्सचा पैसा ‘सुपरस्टार कल्चर’ निर्माण करायला पुरेसे आहेत. पण, वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून, कॅमेरा अँगल्सकडे दुर्लक्ष करून मैदानावर उतरले तरच ‘जण्टलमन स्पिरीट’ कायम राहणार आहे. साबरी ब्रदर्सची कव्वाली इथे आवर्जून आठवते,
‘संसार में बाजे ढोल, ये दुनिया मेरी तरह है गोल, कि पैसा बोलता है...’ 
 
9850339240