वाशीम,
hidden-treasure-hunter : शहरातील ऐतिहासीक वारसा असलेल्या रमेश टॉकीज (टिळक स्मारक भवन) परिसरात गुप्तधन काढण्यासाठी खोदकाम करतांना पोलिसांनी कारवाई करत त्याठिकाणी छापा टाकून काही मजुरांना ताब्यात घेतले असले तरी यामागील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकळेच आहे. त्यामुळे त्यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गट युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, रमेश टॉकीज (टिळक स्मारक भवन) परिसरात १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम करतांना पोलिसांनी धाड टाकून काही लोकांना ताब्यात घेतले. मात्र, यामध्ये शहरातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सुवर्णकाराचा समावेश असतांना केवळ खोदकाम करणार्या मजुरावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांची भूमीका संशयास्पद असून, या प्रकरणातील मोठ्या राजकीय लोकांना पाठीशी घातल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे.
वाशीम हे ऐतिहासीक व पुरातन शहर आहे. गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम करणे म्हणजे शहराच्या ऐतिहासीक व सांस्कृतिक इतिहासाचा अपमान आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने निपःक्ष चौकशी करुन यामागील मुख्य सुत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गट युवा सेनेच्या वतीने रवी भांदुर्गे, गजानन ठेंगडे, शाम दळवी, विजय शेळके, आकाश गायकवाड, रोहित वनजाणी, नंदू जहीरव यांच्यासह पदाधिकार्यांनी केली आहे.