नवी दिल्ली,
Maharashtra in Modi Government's पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दिल्लीतील राजकीय वर्तुळात यासंदर्भातील चर्चांना वेग आला आहे. येत्या 21 मे रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विस्तार किंवा फेरबदलाबाबत महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, अशी चर्चा सध्या रंगली आहे. जरी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी सत्ताधारी वर्तुळात हालचाली वाढल्याचे चित्र दिसत आहे. 21 मे रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा, मंत्रालयांच्या कामकाजाची समीक्षा आणि मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक यापूर्वी 7 मे रोजी होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता या बैठकीकडे केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्राला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रात प्रतिनिधित्व वाढवण्याची संधी मिळू शकते. शिंदे गटातील दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा असून, त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. याशिवाय आणखी एका खासदारालाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्या नावाबाबत अद्याप स्पष्टता नसून, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सध्या नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांच्यासारखे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल अशी भावना असून, महाराष्ट्रातील काही राजकीय वर्तुळांचे लक्ष त्यावरच आहे. दरम्यान, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ प्रशासनिक बदल नसून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणनीतीचा भाग मानला जात आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी लक्षात घेऊन भाजप आणि मित्रपक्षांमध्ये नव्याने समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.