कृषी विभाग, आत्मा प्रकल्प व महिला विकास मंडळाचे आयोजन

३७ प्रजातींच्या आंब्यांनी नटला आंबा महोत्सव

    दिनांक :15-May-2026
Total Views |
बुलढाणा,
mango-festival-buldhana : लहानगे असो की, वडीलधारे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो आंबा इतर अनेक फळे कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होतात. मात्र फळांचा हा राजा विविध रूपाने व प्रजातीमधून कडकत्या उन्हाळ्यातच एखाद्या राजाच्या दिमाखात प्रत्येकाच्या घरी एन्ट्री करतो. फळांच्या या राजाचं महत्व अधोरेखित व्हावे या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प व महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
 
 
k
 
 
 
या महोत्सवाचे उदघाटन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. केशरी, हापूस यासह काळू, पिवळ्या, शेप्या, भदाद्या, शेंद्रया, लाल्या, गोठ्या, नारळ्या, तेल्या, चपट्या, दगड्या या प्रजातींच्या आंब्यांचे स्टॉल्स महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. आधुनिक संकरीत आंबा पिकांच्या वाणांच्या वाढत्या प्रभावामुळे गावरान अथवा रायवळ आंब्यांचे अस्तित्व धोयात येत आहे.
 
 
अशा परिस्थितीत या वाणांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असून पुढील पिढ्यांना याची माहिती व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी स्पष्ट केले. महोत्सवासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. अनिल तारू यांनी केले.