अबुधाबी,
Modi's Grand Entry in Abu Dhabi पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर अबू धाबी येथे दाखल झाले. पाच देशांच्या दौऱ्याची सुरुवात करताना मोदींच्या आगमनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, यूएईने त्यांचे अत्यंत भव्य आणि औपचारिक स्वागत केले. विशेष म्हणजे, मोदींचे विमान यूएईच्या हवाई हद्दीत दाखल होताच एफ-१६ लढाऊ विमानांनी त्याला सुरक्षा कवच दिले आणि विमानतळापर्यंत एस्कॉर्ट केले. अबू धाबी विमानतळावर यूएईचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यानयांनी स्वतः उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा या भेटीदरम्यान दिसून आले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष नाहयान यांच्यातील वैयक्तिक स्नेहसंबंधांमुळे भारत-यूएई संबंध अधिक दृढ होत असल्याचे मानले जात आहे.
मोदींच्या या अल्पकालीन दौऱ्यात ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणमधील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील अस्थिरतेमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असताना, भारतासाठी यूएईसोबतचे ऊर्जा सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान एलपीजी आणि पेट्रोलियम साठ्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर यूएईने भारतासोबत ठाम ऐक्य व्यक्त केले आहे. यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी हा गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच, व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांमध्ये अडथळे निर्माण करणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यूएईने आपल्या निवेदनात भारताच्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर दबाव किंवा आर्थिक ब्लॅकमेलसाठी करणे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचेही यूएईने नमूद केले.भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली असून, बचावकार्यासाठी ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत. व्यावसायिक जहाजे आणि नागरी खलाशांना लक्ष्य करणे थांबवण्याची गरज भारताने पुन्हा अधोरेखित केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला मोदींचा यूएई दौरा राजनैतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.