अबुधाबी,
Modi's UAE Visit: A Superhit पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात भारताला संरक्षण, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठा दिलासा मिळाला आहे. अबू धाबीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणखी मजबूत झाल्याचे दिसून आले. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे अत्यंत भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी “संयुक्त अरब अमिराती हे माझं दुसरं घर आहे,” असे भावनिक वक्तव्य केले. यूएईच्या हवाई दलाने दिलेल्या विशेष सुरक्षेबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नसून संपूर्ण भारतासाठी आहे. भारत प्रत्येक कठीण काळात यूएईच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत ऊर्जा सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य हे मुख्य विषय होते. होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मतभेद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात भारत आणि यूएईदरम्यान सामरिक संरक्षण भागीदारी आराखड्यावर सहमती झाली. संरक्षण उद्योग, सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी मोहीम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी सामरिक पेट्रोलियम साठ्यांबाबतही महत्त्वाचा करार करण्यात आला.
५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक
एलपीजीच्या दीर्घकालीन पुरवठ्यासंदर्भात झालेला करार भारतासाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी मोठा दिलासा मानला जातोय.याशिवाय गुजरातमधील वाडीनार येथे जहाज दुरुस्ती क्लस्टर उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. संयुक्त अरब अमिरातने भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात तसेच आर्थिक संस्थांमध्ये तब्बल ५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे.यूएईवरील अलीकडील हल्ल्यांचा निषेध करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी यूएईने उचललेल्या पावलांचे समर्थन केले. तसेच, कठीण परिस्थितीत यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी यूएई सरकारचे आभार मानले.पश्चिम आशियातील तणावपूर्ण वातावरणात भारत आणि यूएई यांच्यातील वाढते सहकार्य हे केवळ आर्थिकच नव्हे तर सामरिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.