तभा वृत्तसेवा
उमरखेड,
ms-dhoni-cricket-academy : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) वतीने आयोजित अंडर-14 क्लब क्रिकेट स्पर्धेत उमरखेड येथील एमएस धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपली वेगळी छाप उमटवली आहे. त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अॅकॅडमीतील तीन खेळाडूंची विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, महागाव, फुलसावंगी, यवतमाळ, पांढरकवडा आणि उमरखेड येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एमएस धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण पाच सामने खेळत उल्लेखनीय यश संपादन केले.
नववीत शिकणारा शिवानंद काळे याने एका सामन्यात हॅट्रिकसह पाच बळी घेत सर्वांचे लक्ष वेधले. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकूण 13 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तसेच पाचवीचा विद्यार्थी वरद संतोष देव याने 9 बळी, तर पाचवीतील प्रेमसाई मनोज पांडे याने 8 बळी घेत प्रभावी कामगिरी केली.
या तिन्ही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची दखल घेत व्हीसीएतर्फे त्यांची पुढील विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून गुणवंत क्रिकेटपटू घडविण्याचे उल्लेखनीय कार्य एमएस धोनी क्रिकेट अॅकॅडमीमार्फत होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. अॅकॅडमीच्या खेळाडूंना घडविण्यात प्रशिक्षक धनंजय भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या कार्याचे व्हीसीएतर्फे कौतुक करण्यात आले.
विशेष म्हणजे, या अॅकॅडमीत मुलांबरोबरच 8 मुलीदेखील क्रिकेट प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षक धनंजय भागवत यांच्या मार्गदर्शनात त्या फलंदाजी व गोलंदाजीत उत्तम प्रगती करत आहेत. यामध्ये समृद्धी माहुरे, प्राप्ती ढाले, मधुरा रेघाटे, स्वरा रेघाटे आणि निमिषा भुतडा यांचा विशेष उल्लेख केला जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची आवड, आत्मविश्वास आणि गुणवत्ता विकसित करण्याचे मोलाचे कार्य या अकॅडमीमार्फत होत असल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.