७२४३ हेटर क्षेत्रावर नैसर्गिक व सेंद्रिय शेती

    दिनांक :15-May-2026
Total Views |
जिल्ह्यातील ८९२२ शेतकर्‍यांचा पुढाकार
 
वाशीम, 
Natural and Organic Farming जिल्ह्याची नैसर्गिक शेतीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत असून शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहेत. आत्मा व कृषी विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जिल्ह्यात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अभियानास जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पर्यावरणपूरक व खर्चमुक्त शेतीचा नवा आदर्श निर्माण होत आहे.
 
 
Organic Farming
 
सदर योजनांअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ८९२२ शेतकरी ७२४३ हेटर क्षेत्रावर नैसर्गिक व सेंद्रिय शेती करीत आहेत. रासायनिक खत व कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाला पर्याय म्हणून शेतकरी आता नैसर्गिक शेतीचा स्वीकार करीत असून, उत्पादन खर्चात मोठी बचत होत आहे.जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या २१ जैविक निविष्ठा संसाधन केंद्रांच्या माध्यमातून जीवामृत, दशपर्णी अर्क, सेंद्रिय खते तसेच इतर जैविक निविष्ठा निर्मितीबाबत शेतकर्‍यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होत असून जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत होत आहे.तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे सेंद्रिय प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
 
 
Natural and Organic Farming  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आत्मा नियामक मंडळ, वाशीम यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या नैसर्गिक शेती अभियानामुळे जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक शेतीची कास धरत असून, शाश्वत शेतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत. नैसर्गिक शेती हीच भविष्यातील समृद्ध व शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले आहे.