गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीला वेग

    दिनांक :15-May-2026
Total Views |
- ३.८५ लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी

गोंदिया, 
Paddy Procurement महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्‍या आधारभूत धान खरेदी योजनेला गोंदिया जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रब्बी पणन हंगाम २०२५-२६ मध्ये उन्हाळी धान खरेदीला चांगलाच वेग आला आहे. १४ मे २०२६ पर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८५ हजार ८४८.४१ क्विंटल धानाची खरेदी पूर्ण झाली असून ७ हजार ९१६ शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आहे.
 

dhan  
 
Paddy Procurement  जिल्ह्यात धान खरेदीसाठी १८७ केंद्रांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी ११२ केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे. १३ मेपर्यंत ६० हजार ७०८ शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. १४ मे रोजी आणखी ३ हजार २९५ शेतकर्‍यांनी नोंदणी केल्याने एकूण नोंदणीचा आकडा ६४ हजार ३ वर पोहोचला आहे. १३ मेपर्यंत ३ लाख ९ हजार ५६९.६४ क्विंटल धान खरेदी झाले होते. त्यानंतर १४ मे रोजी एकाच दिवशी ७६ हजार २७८.७७ क्विंटल धानाची खरेदी झाल्याने खरेदी प्रक्रियेला मोठी गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मका खरेदीतही समाधानकारक प्रगती दिसून येत आहे. जिल्ह्यात मक्यासाठी १७ केंद्रांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ६ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ३ हजार ४७२ शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून २ हजार ४४७ क्विंटल मक्याची खरेदी पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत ४६ शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. जिल्हा पणन कार्यालयाच्या प्रभावी नियोजनामुळे शेतकर्‍यांना हमीभावाने पीक विक्रीची सुविधा उपलब्ध होत असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
 
शेवटच्या दिवशी केंद्रावर गर्दी ...
यंदाच्या उन्हाळी हंगामात गोंदिया जिल्ह्यासाठी शासनाकडून धान खरेदीचे १६ लाख ५४ हजार ४५७ क्विंटल तर मका खरेदीचे १ लाख ६० हजार क्विंटल उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ मे ही नोंदणीची अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दिवशीही नोंदणी केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी पाहायला मिळाली.