इस्लामाबाद,
Pakistan's new conspiracy against India पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरोधात धोकादायक रणनीती आखत असल्याचे आरोप समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा, तोफा आणि लष्करी उपकरणे थेट निवासी भागांमध्ये हलवत असून, नागरिक वस्त्यांचा वापर संरक्षण कवच म्हणून केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या हालचालींमुळे सीमावर्ती भागांमध्ये तणाव वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून लष्करी पुनर्रचना सुरू असून काही भागांमध्ये ड्रोन आणि निगराणी यंत्रणा तैनात केल्या जात आहेत. या हालचालींचा उद्देश सीमापार हालचालींवर लक्ष ठेवणे आणि संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी करणे असल्याचे सांगितले जात आहे.
लोकवस्तीच्या भागांमध्ये एसएच-१५ तोफ प्रणाली
सियालकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, जांद्रोद गर्ल्स हायस्कूल परिसर आणि भाई बख्तावर विमानतळाजवळील भागांमध्ये लष्करी हालचाली वाढल्याचेही सांगितले जात आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या समोर असलेल्या चितळ, हाजिरा आणि कालीघाटी भागांमध्येही शस्त्र प्रणाली तैनात केल्याचा दावा आहे.बारिला शरीफ गावासारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये एसएच-१५ तोफ प्रणाली बसवण्यात आल्याचेही समोर आले आहे. रावळकोट परिसरात फायरिंग झोन तयार करण्यात आला असून शकरगढ भागात रॉकेट प्रणाली तैनात केल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय कोटला गावात हवाई संरक्षण यंत्रणा, झफरवाल भागात क्षेपणास्त्र प्रणाली आणि काही शाळा परिसरातही तोफा ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भारत सामान्यतः नागरी भागांवर हल्ला करत नाही, त्यामुळे पाकिस्तानकडून लष्करी यंत्रणा नागरिक वस्त्यांमध्ये हलवण्याची रणनीती वापरली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून मानवी ढाल म्हणून नागरिक भागांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये आर्थिक आणि अंतर्गत संकट असतानाही सीमापार तणावपूर्ण हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. भारत या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कोणत्याही परिस्थितीत योग्य आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे संकेत दिले जात आहेत.