नागपुरात पॉल मर्फी यांचा ऑफ्रोटला दौरा

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नागपूर,
Paul Murphys ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागातील अधिकारी तसेच ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेटचे कौन्सिल जनरल पॉल मर्फी यांनी नागपूर येथील ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट) संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. महाराष्ट्रातील आदिवासींच्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी ऑफ्रोट संघटनेने केलेल्या कार्याची दखल घेत ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबईस्थित ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेटमधील पॉलिसी अँड व्हिजिट मॅनेजर श्रीमती एरिका सेक्युयेरा देखील उपस्थित होत्या. ऑफ्रोट संघटनेच्या विविध जिल्हा शाखांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भेटीप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Paul Murphys
 
ऑस्ट्रेलियातील आदिवासी समाजाचा सुमारे ६५ हजार वर्षांचा इतिहास असून, तेथील विविध भाषा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार प्रयत्नशील असल्याचे पॉल मर्फी यांनी सांगितले. Paul Murphys ब्रिटिश वसाहतवादामुळे आदिवासी संस्कृतीवर झालेल्या परिणामांचा उल्लेख करत त्यांनी आदिवासी हक्कांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. ऑफ्रोट संघटनेने ॲड. राजेंद्र मरसकोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी वनहक्क, पेसा भरती तसेच अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पदांवरील गैरप्रकारांविरोधात न्यायालयीन लढे उभे केले आहेत. संघटनेच्या या कार्याची दखल घेत ऑस्ट्रेलियन सरकारने संवादासाठी ऑफ्रोटची निवड केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
भारत आणि ऑस्ट्रेलियातील आदिवासी समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्याची भूमिका मांडताना पॉल मर्फी यांनी शिक्षण, खाण उद्योग तसेच गडचिरोलीतील ‘लाएड’ प्रकल्पाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली. भविष्यात भारतीय आदिवासी युवकांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात ऑस्ट्रेलियात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. Paul Murphys पॉल मर्फी यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने अक्षता लावून व ओवाळणी करून सत्कार करण्यात आला. ऑफ्रोटचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर पॉल मर्फी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. या भेटीसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पॉल मर्फी यांना गोंडी पेंटिंग आणि शाल भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र उईके यांनी केले, तर संघटनेचे सचिव नंदकिशोर कोडापे यांनी आभार प्रदर्शन केले.
सौजन्य: राजेंद्र मरस्कोल्हे, संपर्क मित्र