- स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
- २.७५ लाखाचा मुद्देमाल जप्त
गोंदिया,
Robber Apprehended राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालकाला थांबवून त्याच्याकडून नगदी रक्कम व मोबाईल हिसकावून गुगल पेच्या माध्यमातून ५२ हजार रुपयांची ऑनलाईन चोरी करणार्या आंतरराज्यीय चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवारी १४ मे रोजी नागपूर येथून अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून २.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अयान अब्दुल करीम खान (१९) रा. शास्त्री मार्केट, लोहारपारा, बांसटाल, रायपूर (छ.ग.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Robber Apprehended मिळालेल्या माहितीनुसार सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी/बाम्हणी येथील नेकराम लोकचंद शहारे (५७) हे १२ मे रोजी देवरी येथून आठवडी बाजार करून रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने स्वगावी येत असताना खडकी/बाम्हणी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर आरोपी अयान खान याने त्यांना अडवून त्यांच्याजवळील ३ हजार रुपये व मोबाईल हिसकावला. यावेळी त्यांना दमदाटी देत मोबाईल मधील ‘गुगल पे’चा पासवर्ड मागून पसार झाला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील विविध पेट्रोल पंपावर जावून ४९ हजार ८०० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट टाकून त्यांच्याकडून नगदी रक्कम घेतली. याप्रकरणी नेकराम शहारे यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर तपास स्थानिक गुन्हे शाखाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, १४ मे रोजी पथकाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असता तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे सदर चोरी अयान खान रा. रायपूर याने केली असून तो सद्या नागपूर शहरात फिरत असल्याचे आढळले. यावर पथकाने नागपूर येथे जावून आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता सदर गुन्हा आपणच केल्याचे त्याने कबूल केले. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातून २ लाख रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड हंटरबर्ड दुचाकी, ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व ३० हजार रुपये रोख असा २ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.