संतसाहित्य अभ्यासक सुनील ठाकरेंचा पंढरपुरात सत्कार

संत काशिबा गुरव महाराजांवरील संशोधनाची दखल

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 15 मे
sunil-thackeray   : येथील संत साहित्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करणारे वणी येथील लेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा पंढरपूरजवळील गोपाळपूर येथे संत काशीबा गुरव महाराज समाधी मंदिरात सत्कार करण्यात आला. ‘जनाबाईंचा संसार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरातच संत काशीबा गुरव महाराजांची समाधी आहे.
 
 
y15May-Pandharpur
 
 
 
संत काशिबा महाराजांनी समकालीन संत सावता महाराजांचे अभंग लेखी स्वरूपात जतन केल्याचे मानले जाते. त्यांच्या जीवनकार्यावर संशोधन व लेखन करण्यासाठी सुनील ठाकरे काही दिवस पंढरपुरात वास्तव्यास होते. यावेळी त्यांनी गोपाळपूर येथील संत जनाबाई व श्रीकृष्ण मंदिर परिसरातील संत काशीबा महाराज समाधीस्थळाला भेट दिली.
 
 
या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष दिलीप भोसले, तसेच काशिबा महाराज मठाचे माऊली महाराज गुरव यांच्या हस्ते ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. संतसाहित्य क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याची यावेळी प्रशंसा करण्यात आली.
 
 
सुनील ठाकरे यांनी यापूर्वीही ‘रिंगण’च्या विशेषांकात संत काशिबा महाराजांवर लेखन केले. समाधीस्थळाशी संबंधित नव्या माहितीचा शोध लागल्यानंतर पुढील संशोधनाची जबाबदारी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी ठाकरे यांच्यावर सोपवली.
 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ‘रिंगण’ विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. संतश्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन 13 संतांवर आधारित ‘रिंगण’चे 13 विशेषांक यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. यामध्ये संत कुर्मदास, जगमित्र नागा, जोगा परमानंद, कान्हो पाठक, काशीबा गुरव या संतांचा समावेश आहे.