तभा वृत्तसेवा
आर्णी,
severe-water-scarcity : आर्णी नगर परिषदद्वारे शहरात दर चार दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. ज्यात प्रती व्यक्ती 75 लिटर याप्रमाणे 2.5 एमएलटी (25 लाख लिटर) पाणी दिले जाते. नगर परिषदेचा दावा आहे की, शहरात सध्या पाण्याची कोणतीही टंचाई नाही आणि उपलब्ध पाणी 15 जूनपर्यंत पुरेसे आहे.
आर्णी शहरात 4,232 घरगुती नळजोडण्या आणि 20 व्यावसायिक नळजोडण्या, अशा एकूण 4,252 जोडण्या होत्या. तथापि, थकित देयके आणि प्रलंबित विनंत्यांमुळे यापैकी 117 नळजोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.
शहरातील 4,135 नळजोडणीधारकांना दर दोन दिवसांनी पाणी मिळते. शहरातील पाणीपुरवठ्यासाठी, दोन अधिग्रहित विहिरी आणि नगर पालिकेच्या आठ विहिरींसह एकूण दहा विहिरींमधून पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी साठवण्यासाठी दोन जुन्या पाण्याच्या टाक्या होत्या. तथापि, त्यापैकी एक नादुरुस्त झाल्यामुळे, एकाच टाकीत पाणी साठवले जात आहे. पाण्याच्या टाक्यांचा उपयोग पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी केला जातो. या पाण्याच्या टाक्या आर्णी शहराला पाणीपुरवठा करतात.
टाक्या व इतर दुरुस्त्यांसाठी पाच जणांचे पथक उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, शहरात एकूण 250 बोअरवेल आहेत, त्यापैकी 10 पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बंद आहेत, तर काहींची अवस्था खराब आहे.
या पद्धतीने 25 लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेत दोन नवीन पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. मालानी लेआऊटमधील नवीन पाण्याच्या टाकीची क्षमता 15 लाख लिटर आहे, तर डोंगा कॉलनीमधील नवीन पाण्याच्या टाकीची क्षमता 15 लाख लिटर आहे, अशी माहिती नप पाणीपुरवठा अभियंता मनोज कुडमेथे यांनी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच
आर्णी शहराची नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल. शहरात पाण्याची टंचाई नाही. याशिवाय महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी उन्नयन अभियानाचा भाग असलेल्या आर्णी शहर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या योजनेद्वारे शहरातील रहिवाशांना स्वच्छ पाणी मिळेल.
छबुताई चारोडे
पाणीपुरवठा सभापती, आर्णी नगर परिषद
ग्रामीण परिस्थिती गंभीर
आर्णी तालुक्यात एकूण 103 गावे आहेत. यावर्षीही तालुक्यात 50 गावे तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. 4 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इचोरा, पालोडी, कारेगाव (पर्धी बेडा) येथे टँकर पाठवण्यात आले आहेत, तर सुधाकरनगर (पालशी) येथे टँकरचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पंकज वाघमारे
पाणीपुरवठा विभाग
आर्णी पंचायत समिती