लखीमपूर खेरी,
Student Commits Suicide Due to NEET नीट (यूजी) परीक्षेशी संबंधित तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 21 वर्षीय हृतिक मिश्रा या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक मिश्रा हा मूळचा हसनपूर कटौली गावचा रहिवासी होता आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करत होता. हा त्याचा तिसरा प्रयत्न होता आणि यावेळी तो पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करत होता. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) 3 मे रोजी होणारी नीट यूजी परीक्षा रद्द केली होती. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली होती.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा रद्द झाल्यानंतर हृतिक मानसिक तणावात होता. बुधवारी तो शहरातून घरी परतला होता आणि त्यानंतर काही वेळातच त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच लखीमपूर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र टीका केली. त्यांनी देशातील परीक्षा घोटाळे, रद्द झालेल्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांचा उल्लेख करत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रियांका गांधी यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.