टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन; रवी शास्त्रींनी थेट नावच सांगितलं!

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
team-india-new-captain : भारतीय टी-२० संघाचा पुढील कर्णधार कोण असणार? या प्रश्नाने सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू केली आहे. सूर्यकुमार यादवचा ढासळलेला फॉर्म पाहता, बीसीसीआय आता नेतृत्वासाठी नवीन पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांची नावे आघाडीवर असतानाच, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संजू सॅमसनच्या नावावर शिक्कामोर्तब करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
 
 
RAVI
 
रवी शास्त्री यांनी आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की, संजू सॅमसनमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना संजूने सलामीला येत बॅटने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने ११ सामन्यांत दोन शतकांसह ४३० धावा कुटल्या असून दिल्लीविरुद्धची त्याची ११५ धावांची नाबाद खेळी यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
 
दुसरीकडे, पंजाब किंग्सचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर हा देखील या शर्यतीत प्रबळ दावेदार आहे. श्रेयसने १२ सामन्यांत पाच अर्धशतकांच्या मदतीने ३९६ धावा केल्या आहेत. सध्या गुणतालिकेत पंजाब चौथ्या तर चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत असल्याने, आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर बीसीसीआय अधिकृतपणे नव्या कर्णधाराची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शास्त्रींच्या या भाकितामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांमध्ये आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.