चंद्रपूर,
thali-bajao-movement-of-obcs : जनगणना 2026 प्रक्रियेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश न केल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज आणि ओबीसी सेवा संघाच्या वतीने शुक्रवार, 15 मे रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

यावेळी ओबीसींना न्याय द्या, जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम द्या, ज्यांची जेवढी संख्या तेवढा वाटा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल डहाके यांनी, ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर येणे अत्यंत आवश्यक असून, त्याशिवाय शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आरक्षणाचे योग्य नियोजन होऊ शकत नाही, असे सांगितले. ओबीसींना ‘इतर’ या वर्गात टाकणे म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे आहे. सरकारने तात्काळ स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारही दिला. आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य शासनावर ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला निवेदन सादर करण्यात आले असून, आगामी काळात राज्यव्यापी जनजागृती, मोर्चे आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात अॅड. विलास माथनकर, नंदू नागरकर, अॅड.पुरुषोत्तम सातपुते, श्रीधर मालेकर, विजय टोंगे, भाविक येरगुडे, इरफान शेख, राजू बनकर, अॅड. दत्ता हजारे, महापौर संगीता खांडेकर, सुनीता लोढिया, बळीराज धोटे, वनश्री मेश्राम, प्रवीण पडवेकर आदींसह ओबीसी समाजातील प्रतिनिधी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.