नवी दिल्ली,
This team is out of the World Cup २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी क्रिकेटविश्वात एक अनोखी आणि चर्चेची बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे आगामी विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी असली, तरी त्यापैकी एका यजमान संघालाच स्पर्धेत खेळण्याची हमी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आयसीसीच्या नियमांमुळे नामिबियासमोर मोठे संकट उभे राहिले असून, त्यांना अजूनही पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागणार आहे.

आयसीसीच्या विद्यमान नियमानुसार, केवळ पूर्ण सदस्य असलेल्या देशांनाच यजमान म्हणून थेट विश्वचषकात प्रवेश मिळतो. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे पूर्ण सदस्य असल्यामुळे त्यांना थेट संधी मिळणार आहे. मात्र, सहयोगी सदस्य असलेल्या नामिबियाला हा लाभ मिळत नाही. त्यामुळे यजमान असूनही त्यांना पात्रता प्रक्रियेतून जावे लागत आहे.सध्या सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-२ स्पर्धेत नामिबियाची स्थिती फारशी मजबूत नाही. संघाने आतापर्यंत २८ सामने खेळले असून त्यात केवळ १० विजय मिळवले आहेत, तर १६ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात २२ गुण जमा झाले आहेत आणि ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. स्कॉटलंड, अमेरिका, ओमान आणि नेदरलँड्स हे संघ त्यांच्यापेक्षा पुढे आहेत.
विश्वचषकासाठी थेट अंतिम पात्रता फेरी गाठायची असेल, तर नामिबियाला पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांना आगामी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. जुलै महिन्यात नेदरलँड्स आणि नेपाळविरुद्ध होणारे सामने त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मात्र, सध्याची कामगिरी पाहता हे आव्हान सोपे मानले जात नाही.जर नामिबिया पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकला नाही, तर त्यांच्यासाठी पात्रता प्लेऑफ हा शेवटचा पर्याय उरेल. त्या फेरीतही त्यांना सातत्याने विजय मिळवून मुख्य पात्रता स्पर्धेत प्रवेश निश्चित करावा लागेल. या टप्प्यावर त्यांना अधिक मजबूत आणि अनुभवी संघांविरुद्ध खेळावे लागू शकते, ज्यामुळे त्यांचा मार्ग आणखी कठीण होणार आहे.क्रिकेट इतिहासात यजमान देश विश्वचषकातून बाहेर राहण्याची वेळ क्वचितच आली आहे. त्यामुळे नामिबियासमोर उभे राहिलेले हे संकट क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काही महिन्यांतील कामगिरीवरच नामिबियाचे विश्वचषकातील भविष्य ठरणार आहे.