तभा वृत्तसेवा
उमरखेड,
umarkhed-police : शहरातील राजापूर (टाकळी) येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उमरखेड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत पर्दाफाश केला असून या प्रकरणातील आरोपीस अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वनिता मोहिते यांनी 18 ऑक्टोबर 2025 रोजी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्या बाहेरगावी असताना घरातील कपाटातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या चोरीमध्ये 3 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला होता
या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनात डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख उपनिरीक्षक सागर इंगळे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मनोहर चव्हाण (वय 46, राजापूर टाकळी, ता. उमरखेड) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालक व संगीता मोहिते यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून दागिने, रोख रक्कम तसेच मोटारसायकल असा एकूण 7 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमान गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ, पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक सागर इंगळे करीत आहेत.