ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

मानसिक आरोग्य जनजागृतीतील मोठे व्यक्तिमत्त्व हरपले

    दिनांक :15-May-2026
Total Views |
मुंबई, 
dr anand nadkarni ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
dr anand nadkarni
 
 
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोठे योगदान दिले. मानसिक विकारांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज त्यांनी सातत्याने मांडली. त्यांनी उपचार, व्याख्याने, पुस्तके, लेखन, पॉडकास्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली.
मानसिक आरोग्य क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात मानसिक आरोग्य संस्था या संस्थेची स्थापना केली. आयपीएचच्या माध्यमातून मानसिक विकारांवरील उपचार, समुपदेशन आणि समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी उभे केले. मानसिक विकारांवर संमतीशिवाय होणाऱ्या उपचारांविरोधात त्यांनी आवाज उठवत संवेदनशील चळवळ उभारली होती.
एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये मानसोपचारशास्त्र विषयात एमडी पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय राहिले. डॉक्टर म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, चित्रकार आणि समाजसेवक म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ठाण्यातील समता नगर परिसरात ते वास्तव्यास होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.dr anand nadkarni डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.