वाघाडी नदी पदयात्रा उद्या

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
waghadi-river-foot-march : ‘पाणी आहे तर जीवन आहे’ त्यामुळेच नदी संवर्धन ही काळाची गरज आहे. नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती आपल्या संस्कृतीची, पर्यावरणाची सर्व सजीवांच्या अस्तित्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे वाघाडी नदी वाचवा अभियान संघटनेतर्फे शनिवार, 16 मे रोजी वाघाडी नदी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 

y15May-Waghadi 
 
 
 
महाराष्ट्रात नर्मदा परिक्रमा, पैनगंगा पदयात्रा प्रसिद्ध आहेत. नदी वाचवा अशा घोषणा देण्यापेक्षा प्रत्यक्ष नदीच्या काठाने 5 ते 10 किमी चालल्यास कुठे पाणी आहे, कुठे कचरा आहे, कुठे वाळू उपसा आहे हे लक्षात येते. आपली नदी जिवंत आहे का हे कळते. यासाठीच वाघाडी नदी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेमुळे गाव आणि नदीचं तुटलेलं नात पुन्हा जोडलं जाणार आहे. या नदी पदयात्रेच्या माध्यमातून जलसंस्कृती जिवंत ठेवण्याचे मार्ग निघणार आहेत. पर्यावरण जागृतीचा मार्ग साधता येणार आहेत. तसेच आरोग्य आणि आध्यात्माची सांगड घालता येणार आहे.
 
 
वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन करणे ही आता केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ते आपले नैतिक कर्तव्य बनले आहे. यासाठी वाघाडी नदीकाठाने पदयात्रा आयोजित केली आहे. ही पदयात्रा म्हणजे नदीला पुन्हा प्रवाहित करण्यासाठी एकत्र येऊन विचारमंथन करण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. जनता एकत्र आली तरच वाघाडी नदी पुन्हा खळाळणार आहे.
 
 
ही पदयात्रा शनिवार, 16 मे रोजी सकाळी 7 वाजता आकपुरी सीमेवरील पवन निकम यांच्या शेतातून सुरू होणार आहे. यावेळी यात्रेचे संयोजक प्रशांत उगले मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9 वाजता पदयात्रेच्या शेवटी मुरली येथील प्रवीण चौधरी यांच्या शेतात निरीक्षण व संवाद साधण्यात येणार आहे.
 
 
नदीपात्राच्या निरीक्षणावर आधारित खुल्या चर्चेत सहभागी आपले अनुभव व भविष्यातील उपाययोजनांबाबत मते मांडतील. संतोष गोलर यांच्या मार्गदर्शनाने समारोप होणार आहे. पदयात्रेत सहभागी होण्यासाठी बूट वापरावेत. नदीचे भविष्य व पर्यावरण रक्षणासाठी या पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाघाडी नदी वाचवा अभियान व इतर सहभागी सामजिक संस्थांनी केले आहे.