बंगालमध्ये ‘योगी मॉडेल’ची एंट्री!

अतिक्रमण हटवण्यासाठी UP मधून बुलडोझर

    दिनांक :15-May-2026
Total Views |
कोलकाता,
Yogi Model Enters Bengal पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. सिलिगुडी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेण्याची तयारी सुरू केली असून, यासाठी उत्तर प्रदेशातून दोन डझन बुलडोझर मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता यांनी सिलिगुडीमध्ये अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कायदा-सुव्यवस्था, अमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री आणि अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
Yogi Model
 
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजू बिस्ता यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याचा आरोप केला. सरकारी जमीन, नदीकिनारे आणि शहरातील विविध भागांमध्ये झालेली बेकायदेशीर अतिक्रमणे तात्काळ हटवली जाणार असून, गरज पडल्यास बुलडोझरच्या सहाय्याने कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.त्यांनी सिलिगुडी महानगरपालिकेच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. अतिक्रमणांना रोखण्यात महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी लवकरच अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात स्पष्टीकरण मागणार असल्याचे सांगितले.याशिवाय शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करी, नदीतील बेकायदेशीर उत्खनन, अवैध टोल वसुली आणि जमिनीच्या दलालीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईची तुलना उत्तर प्रदेशातील तथाकथित ‘बुलडोझर मॉडेल’शी केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात गुन्हेगार आणि बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवायांची देशभर चर्चा झाली होती. आता पश्चिम बंगालमध्येही त्याच धर्तीवर कठोर प्रशासनिक पावले उचलली जात असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.