नागपूर-तुळजापूर महामार्गावरील घटना
आर्णी,
Accidental Death भरधाव अनोळखी मालवाहू वाहनाने लग्नाला आलेल्या पाहुण्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री नऊच्या दरम्यान नागपूर-तुळजापूर महामार्गावरील लोणबेहळजवळ घडली. प्रमोद माणिक डुकरे (वय 52, रा. लाख (खिंड), दारव्हा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा नातेवाईक रूपेश गावंडे यांनी आर्णी पोलिसांत अनोळखी वाहन चालकाविरोधात तक्रार दिली.
Accidental Death आर्णी तालुक्यातील शेलू (शेंदुरसनी) येथील रूपेश गावंडे यांच्या काकाच्या मुलाचे लग्न होते. या निमित्त मृत आतेभाऊ प्रमोद डुकरे आठ दिवसांपूर्वीच परिवारासह आले होते. लग्न आटोपताच सर्व कुटुंबीय गावी परत गेले होते. तर मृत पाहुणा म्हणून घरी मुक्कामी होता. दरम्यान, गुरुवारी लोनबेहळ येथील वनश्री हॉटेलमध्ये एका कंपनीच्या कार्यक्रमासाठी पोहचला होता. जेवणानंतर अंजनखेड येथील अशोक गावंडे यांच्या मोटर सायकलवर बसून जात होते. रात्री शेंदुरसनी रस्त्यावरील नीलेश आचमवार यांच्या शेताजवळ त्यांना अनोळखी मालवाहू वाहनाने धडक दिली. या धडकेत प्रमोद डुकरे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रूपेश गावंडे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात अनोळखी मालवाहू वाहनाविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. घटनास्थळाचा पंचनामा जमादार संजय चव्हाण, सतीश चौधर, संदीप ढेंगे यांनी केला.