Action Taken Against Fertilizer Stock कृषी विभागाने अनधिकृत खत साठ्यावर कारवाई करून 700 पाकीट जिप्समसह 15 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शुक्रवार, 15 मे रोजी करण्यात आली. कृषी विभागाला ढाणकी येथे एका ट्रकमध्ये अनधिकृत खत साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उभ्या असलेल्या संशयित ट्रकची कसून तपासणी करण्यात आली.
या ट्रकमध्ये एचएमएम इंडस्ट्रीज, बिकानेर उत्पादित व आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर यांचे बिल असलेली संशयास्पद 50 किलो वजनाच्या एकूण 700 गोण्या जिप्सम पावडर आढळली. कृषी विभागाच्या पथकाने या कारवाईत ट्रकसह 15 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. या प्रकरणी जगदीशप्रसाद (हनुमाननगर जि. नागोर, राजस्थान) व इतर एकास ताब्यात घेण्यात आले. राजेंद्र डांगारे यांच्या तक्रारीवरून ढाणकी पोलिस ठाण्यात खत नियंत्रण आदेश 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Action Taken Against Fertilizer Stock ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कृषी विकास अधिकारी लहुदास आडे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, कृषी अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण राजेंद्र डांगारे, कृषी अधिकारी संजय गुज्जलवार, कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण भारत चेके आणि वरिष्ठ लिपिक मोरेश्वर अम्मडवर यांनी पार पाडली.