तेहरान,
AK-47 Training on Iranian TV अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून समोर आलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. इराणच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर नागरिकांना AK47 सारखी रायफल कशी वापरायची याचे प्रात्यक्षिक दाखवले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.व्हायरल व्हिडिओमध्ये एका स्टुडिओमध्ये अँकरच्या हातात AK47 दिसत आहे, तर त्याच्यासमोर लष्करी गणवेशातील व्यक्ती बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. या व्हिडिओचा उद्देश नागरिकांना संभाव्य युद्धपरिस्थितीसाठी तयार करणे असल्याचा दावा काही माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओची अधिकृतपणे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, अमेरिकेकडून इराणविरोधात नव्या लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमासह तेल सुविधांबाबत अमेरिकेची चिंता वाढल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या प्रस्तावांवर नाराजी व्यक्त करत कठोर भूमिका कायम असल्याचे संकेत दिले आहेत. बीजिंगहून परतताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी इराणबाबत कोणताही निर्णय हलक्यात घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मध्यपूर्वेतील बदलत्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढत असून, इराणमधून समोर आलेल्या या व्हिडिओमुळे युद्धाच्या शक्यतांबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.