वर्णभेदाच्या आरोपांनंतर अर्शदीप ट्रोल!

    दिनांक :16-May-2026
Total Views |
धर्मशाला,
Arshdeep trolled after racism आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानाबाहेरील एका व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तिलकच्या रंगावर केलेल्या टिप्पणीमुळे अर्शदीपवर टीकेची झोड उठली आहे. सामन्यापूर्वीच्या या व्हिडीओमध्ये अर्शदीप सिंह तिलक वर्माशी मिश्किलपणे बोलताना दिसतो. मात्र त्याच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वर्णभेदाच्या आरोपांना सुरुवात झाली. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी अर्शदीपला ट्रोल केले आणि त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
 
 

Arshdeep trolled after racism 
या वादानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अर्शदीपवर कठोर कारवाईची मागणी केली. अशा प्रकारच्या वक्तव्यांना क्रिकेटमध्ये स्थान नसून संबंधित खेळाडूवर बंदी घालण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी स्वतःसोबतही वर्णभेदासारखा अनुभव आल्याचा दावा केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. दरम्यान, मैदानावर मात्र तिलक वर्माने आपल्या बॅटमधून जोरदार उत्तर दिले. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत अवघ्या ३३ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्सला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला. २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिलकची खेळी निर्णायक ठरली. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सनेही सोशल मीडियावर तिलक वर्माचा “प्लेअर ऑफ द मॅच” ट्रॉफीसह व्हिडीओ पोस्ट केला. या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली आणि अनेकांनी त्याला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर मानले. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएलमध्ये मैदानाबाहेरील वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.