तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर तीन अस्वलांचा जीवघेणा हल्ला

    दिनांक :16-May-2026
Total Views |
- बाक्टीच्या घाटराई जंगलात घडली थरारक घटना
- तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्याची चौथी घटना

अर्जुनी मोरगाव, 
Bears Attack Woman तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, मौजा बाक्टी येथे पुन्हा एकदा अस्वलांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर तब्बल तीन अस्वलांनी जीवघेणा हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
 
Bears Attack
 
गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव रेखा दिलीप भोयर (वय ४० वर्षे), रा. बाक्टी ता. अर्जुनी मोरगाव असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा भोयर या आज पहाटे गावातील इतर महिलांसोबत नेहमीप्रमाणे घाटराई जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता गोळा करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या तीन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलांना पाहताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळील झाडावर चढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या अस्वलांनी त्यांना झाडावरून खाली खेचत जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.
 
 
 
Bears Attack Woman  सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर अस्वले जंगलाच्या दिशेने पसार झाली. त्यानंतर जखमी अवस्थेतील रेखा भोयर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे रेफर केले. दरम्यान, अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांची ही अल्पावधीत घडलेली चौथी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून गस्त वाढवावी तसेच प्रभावित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.