एलएसजीच्या विजयावर विरजण!

कर्णधार पंतला दंड

    दिनांक :16-May-2026
Total Views |
लखनौ,
Captain Pant fined इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवत चाहत्यांना आनंद दिला, मात्र सामन्यानंतर संघाचा कर्णधार ऋषभ पंत मोठ्या अडचणीत सापडला. संथ षटकगतीबद्दल बीसीसीआयने पंतवर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून आयपीएल आचारसंहितेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एलएसजीने प्रभावी कामगिरी करत चेन्नईवर मात केली. मात्र सामन्यादरम्यान संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. त्यामुळे आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत लखनौ सुपर जायंट्सला दोषी ठरवण्यात आले. या हंगामातील संथ षटकगतीबाबत एलएसजीचा हा पहिलाच गुन्हा असल्याने कर्णधार ऋषभ पंतवर १.२ दशलक्ष म्हणजेच १२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
 
 
 
Captain Pant fined
विशेष म्हणजे, या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरलेलाच नाही. आयपीएल २०२६ मध्ये प्रथमच असे घडले की पंतला फलंदाजीची संधी मिळाली नाही. याआधीच्या सामन्यांमध्ये तो बहुतांश वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या हंगामात त्याने सात वेळा तिसऱ्या क्रमांकावर, तीन वेळा चौथ्या क्रमांकावर आणि एका सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजी केली होती.सामन्यानंतर बोलताना पंतने संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. योग्य सलामीची जोडी शोधण्यासाठी संघ सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
सुरुवातीला मिचेल मार्श आणि एडन मार्कराम यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला होता, मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने नंतर जोश इंग्लिसला संधी देण्यात आली. संघाचे संयोजन चांगले असले तरी अधिक प्रयोग कधी कधी संघासाठी अडचणीचे ठरतात, असेही पंतने नमूद केले. आपल्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल बोलताना पंत म्हणाला की, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार असतो. मात्र काही खेळाडूंना पुरेशी संधी मिळालेली नसल्याने त्यांना संधी देण्याचा संघाचा विचार होता. विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असला तरी कर्णधारावर झालेल्या कारवाईची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.