नवी दिल्ली,
Delivery boy strike today पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात देशभरातील गिग वर्कर्सनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शनिवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत झोमॅटो, स्विगी, ब्लिंकइट आणि झेप्टो या लोकप्रिय ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध शहरांतील डिलिव्हरी बॉय आणि गिग कामगारांनी या कालावधीत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना फूड, ग्रोसरी आणि इतर वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर, नोएडा आणि गुरुग्रामसारख्या मोठ्या शहरांमध्ये लाखो नागरिक दैनंदिन गरजांसाठी या ऑनलाइन ॲप्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे या संपाचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना डिलिव्हरी उशिरा मिळण्याची किंवा काही ऑर्डर्स रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गिग वर्कर्सचे म्हणणे आहे की, इंधन दरात सातत्याने वाढ होत असताना त्यांच्या कमाईत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे डिलिव्हरी पार्टनर्सचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे कंपन्यांनी डिलिव्हरी चार्जेस आणि इन्सेंटिव्हमध्ये वाढ करावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली. गेल्या चार वर्षांनंतर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह वाहतूक आणि डिलिव्हरी क्षेत्रावरही आर्थिक ताण वाढला आहे. दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ९७.७७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९०.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.गिग कामगारांनी हा संप केवळ पाच तासांसाठी ठेवला असला तरी त्याचा परिणाम मोठ्या शहरांतील ऑनलाइन सेवा व्यवस्थेवर दिसून येण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी ग्राहकांना आवश्यक वस्तूंच्या ऑर्डर्स वेळेत देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.