शेतीचे नुकसान, आंदोलनाचा इशारा
देवळी,
Deoli Municipal Council नगरपरिषदेमार्फत अंदोरी येथील वर्धा नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी कोल्हापूर (शिं.) गावाजवळ एक वर्षापासून फुटून परिसरातील शेतकर्यांच्या शेतात पाणी जमा होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही नप प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारी १६ किमी अंतराची ही जलवाहिनी कोल्हापूर (शिं.) परिसरात लिकेज झाल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून हे पाणी शेजारच्या शेतात शिरत आहे. त्यामुळे शेती सतत ओली राहत असून शेतीचे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात मशागतीच्या कामातही अडथळा येत असल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे.
Deoli Municipal Council शेतकरी संजय ढवळे यांनी शेतात दूध डेअरी समोर व शेतात पाणी वाहत असल्याने नपच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार दिली होती. अनेकदा अभियंत्यांची भेट घेऊन जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, न.प.ने जेसीबीने खड्डा करून ठेवला. त्यापुढे काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकर्यांचे कैवारी म्हणवून घेणारे अनेकजण पुढे येतात मात्र प्रत्यक्ष समस्यांकडे कोणीच लक्ष देत नाही अशी खंत शेतकर्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही तर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवळी बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन महल्ले यांनी दिला आहे.