नवी दिल्ली
Amit Shah देशातील मादकपदार्थांचा वाढता धोका आणि यात सहभागी तस्करांचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने आराखडा तयार केला आहे. 2047 पर्यंत ड्रग्ज मुक्त भारत आणि तस्करांची पाळेमुळे उद्ध्वस्त केली जातील, अशी घोषणा शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
Amit Shah पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2047 पर्यंत देशाला मादपदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे अमित शाह यांनी राजधानी दिल्लीत रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगद्वारे (रॉ) आयोजित रामेश्वर नाथ काव मेमोरियल परिसंवादाला संबोधित करताना सांगितले. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी येत्या काही वर्षांत मादकपदार्थ सिंडिकेट्सचे उच्चाटन करण्यासाठी एक आराखडा तयार केला आणि त्यावर काम सुरू झाले आहे.
Amit Shah भारताच्या शून्य सहिष्णुता धोरणांतर्गत, देश हे सुनिश्चित करेल की राज्याबाहेरून एक ग्रॅम मादकपदार्थही देशात येणार नाही किंवा सीमांच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही. मादकपदार्थांच्या विक्रीतून मिळणारा पैसा दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्यांना निधी पुरवतो आणि समांतर अर्थव्यवस्थेला चालना देतो, जे कोणत्याही परिस्थितीत अस्वीकारार्ह आहे.
Amit Shah 40 पेक्षा जास्त गुन्हेगारांचे प्रत्यार्पण
आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या गरजेवर भर देताना शाह म्हणाले, मादकपदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अनेक देशांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. मित्र देशांच्या सहकार्याने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यात आले. तरुणांना मादकपदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
Amit Shah 182 कोटींचे ‘जिहादी ड्रग’ जप्त
मादकपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ‘ऑपरेशन रेजपिल’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा भंडाफोड करीत भारतात पहिल्यांदाच 182 कोटी रुपयांचे ‘कॅप्टागॉन’ नावाचे मादकपदार्थ जप्त केले. त्याला ‘जिहादी ड्रग’ नावानेही ओळखले जाते. या मादकपदार्थाचा साठा मध्यपूर्वेतील देशांमध्ये पाठवला जाणार होता. मात्र, भारतीय यंत्रणांनी सतर्कता दाखवत हा डाव हाणून पाडला. याप्रकरणी एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती शाह यांनी दिली. ‘एनसीबी’च्या कामगिरीचे कौतुक करताना ते म्हणाले, भारताच्या भूमीचा वापर करून होणारी ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी एनसीबी कटिबद्ध आहे.
Amit Shah ‘जिहादी ड्रग्ज’ काय आहे ?
‘कॅप्टागॉन’ हे मूळचे ‘फेनेटिलाईन’ या सिंथेटिक उत्तेजकाचे ब्रॅण्ड नाव आहे. 1960 च्या दशकात एकाग्रतेचा अभाव, नैराश्य आणि अतिझोप येणे यासारख्या आजारांवरील उपचारांसाठी हे औषध विकसित करण्यात आले होते. या औषधामुळे मादकपदार्थांचे व्यसन जडत असल्याचे समोर आल्यानंतर, 1980 च्या दशकात संयुक्त राष्ट्राने याला प्रतिबंधित मादकपदार्थांच्या यादीत टाकले. दहशतवाद्यांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळेच याला जगभरात ‘जिहादी ड्रग’ असे नाव पडले.