चौघांविरोधात गुन्हा दाखल
वणी,
Irregularities Exposed in Plot Sales वणी तालुक्यातील मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट विक्री प्रकरणात महसूल विभागातील धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, बनावट फेरफार, खोटे सातबारा आणि बनावट व्यवहाराच्या आधारे नागरिकांची फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी, दलाल आणि कथित जमीनमालक अशा चौघांविरोधात वणी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सूरज रमेश चाटे हे खाजगी नोकरीसह पत्रकारिताही करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सतीश केराम याने मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट विक्रीस असल्याचे सांगून त्यांची व संजय तरवटकर यांची भेट शैलेश वाकडे यांच्यासोबत घालून दिली.
संबंधित प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगत सातबारा, फेरफार आणि नकाशा दाखविण्यात आला. तसेच तलाठी रवींद्र उपरे व मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनीही ही कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर 19 जुलै 2024 रोजी वणी दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखत नोंदवून तक्रारदाराकडून एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे घेण्यात आली. मात्र काही दिवसांनी प्लॉटची मोजणी करताना हा प्लॉट प्रत्यक्षात दीपक भट्टाचार्य यांच्या नावावर असल्याचे समोर आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Irregularities Exposed in Plot Sales फेरफार क्रमांक 1539 हा पूर्णपणे बोगस असून दाखविण्यात आलेला आहे. 2015 मधील व्यवहार प्रत्यक्षात कधीच झाला नसल्याचे महसूल विभागातील चौकशीत स्पष्ट झाले. गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर तलाठ्यानेच फेरफार रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केल्याची बाबही समोर आली आहे. उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी होऊन संबंधित फेरफार आणि नोंदी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील तक्रारदाराची आर्थिक फसवणूक झाल्याने अखेर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बनावट फेरफारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जमीन घोटाळ्यांचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत पत्रकारांचा ठिय्या
संबंधित प्रकरणात सुरुवातीला गुन्हा नोंद होत नसल्याने वणीतील पत्रकारांनी शुक्रवार, 15 मे रोजी रात्री थेट पोलिस ठाण्यात चटई टाकून ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतरच पत्रकारांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि आमदार संजय देरकर यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन पत्रकारांशी चर्चा केली व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली.