लातूरमधील कोचिंग नेटवर्क सीबीआयच्या निशाण्यावर

    दिनांक :16-May-2026
Total Views |
लातूर,
Latur's Coaching Network Under CBI नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठे वळण मिळाले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय) या प्रकरणातील प्रमुख संशयित पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक असलेले कुलकर्णी हे महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी असून त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तपास यंत्रणांना संशय आहे की, त्यांनी नीट परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आपल्या अनुभवाचा आणि संपर्कांचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका फुटीच्या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सीबीआयच्या तपासानुसार, पी.व्ही. कुलकर्णी हे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीशी संबंधित प्रक्रियेत सहभागी होते आणि निवृत्तीपूर्वी अनेक वेळा नीट प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे २०२४ मधील पेपरफुटी आणि इतर संशयित प्रकरणांमध्येही त्यांची भूमिका तपासली जात आहे. सध्या CBIचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून असून विविध कोचिंग संस्था, त्यांचे संचालक, काही पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.
 
 
Latur
 
तपासादरम्यान मनीषा वाघमारे नावाच्या महिलेचे नावही समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुलकर्णी आणि वाघमारे यांनी मिळून विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी एक संघटित नेटवर्क उभे केले होते. विविध सेमिनार, एजंट आणि कोचिंग संस्थांच्या माध्यमातून अभ्यासात कमकुवत पण आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात होते. काही वरिष्ठ विद्यार्थी आणि अभियांत्रिकी शाखेतील युवकांनाही एजंट म्हणून वापरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात आर्थिक व्यवहारांचाही मोठा तपशील समोर आला आहे. नीटपरीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या खात्यात लाखो रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून २५ हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचा संशय आहे. गरीब विद्यार्थ्यांना या रॅकेटमध्ये माध्यम म्हणून वापरले जात होते, तर श्रीमंत कुटुंबांतील विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तपासात लातूरचा थेट संबंध समोर आला नव्हता. मात्र एका पालकाच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि प्रकरण CBIकडे सोपवण्यात आले. आता लातूरमधील अनेक कोचिंग संस्था आणि त्यांच्या व्यवस्थापनाची चौकशी सुरू असून, प्रश्नपत्रिका वितरणासाठी मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी देशभरात प्रसिद्ध असलेला “लातूर पॅटर्न” आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून, या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.