*भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी
*ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी
दिनांक :16-May-2026
Total Views |
वर्धा,
upsc results केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने जाहीर झालेल्या भारतीय वन सेवा परीक्षा २०२५ च्या अंतिम निकालात ‘महाज्योती’कडून प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या ८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या निकालासह ‘महाज्योती’ने यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये यश मिळवणार्या आपल्या विद्यार्थ्यांचा शंभरीचा आकडा पार केला आहे.
राज्यातील बहुजन समाजातील, विशेषतः ग्रामीण आणि सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आयएएस आणि आयएफएस सारख्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाज्योती’ केंद्रबिंदू ठरत आहे. वन सेवेच्या अंतिम निवड यादीत मोहिनी जगताप (४६ रँक), रोहित मालावेकर (६२ रँक), रोहित पवार (६९ रँक), सोहम शेंडे (७५ रँक), अक्षय पवार (८१ रँक), प्रतिक कुशारे (१०० रँक), दर्शन सूर्यवंशी (१०२ रँक) आणि अभिषेक कट्टे (१०७ रँक) या ८ गुणवंतांनी स्थान मिळवले आहे. हे सर्व विद्यार्थी आता भारतीय वन सेवेमध्ये (आयएफएस) अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी दिली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि संस्थेच्या पारदर्शक प्रशिक्षण प्रणालीला दिले आहे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले होते.upsc results याशिवाय अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव मुलाखती आणि अद्ययावत अभ्यास साहित्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. महाज्योतीसाठी यूपीएससी निकालात १०० यशस्वी बहुजन विद्यार्थ्यांची कामगिरी ही सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीतील एक मोठी क्रांती असल्याचे मिलिंद नारिंगे यांनी सांगितले आहे.