सोपोरमध्ये दहशतवादविरोधी मोठी कारवाई

जमात-ए-इस्लामी प्रकरणात १५ ठिकाणी छापे

    दिनांक :16-May-2026
Total Views |
सोपोर,
Major Operation in Sopore जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर परिसरात पोलिसांनी दहशतवादविरोधी मोहिमेला वेग देत मोठी कारवाई केली आहे. बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंधित प्रकरणात यूएपीए अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी १५ हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आणि फुटीरतावादी नेटवर्कशी संबंधित व्यक्तींवर लक्ष ठेवून ही मोहीम राबवण्यात आली. जामिया कदीम, नसीम बाग, क्रँकशिवन, तर्जू, अमरगढ, वारपोरा, बोमाई, बोइटिंगू तसेच आसपासच्या अनेक भागांमध्ये शोधमोहीम पार पडली. सोपोर पोलीस ठाण्यात यूएपीएच्या कलम १० आणि १३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक ४२/२०२५ च्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
 
 
Major Operation in Sopore
 
पोलिसांनी सांगितले की, सर्व छापे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून टाकण्यात आले. यूएपीए न्यायालयाकडून शोध वॉरंट घेण्यात आले होते. तसेच संपूर्ण कारवाईदरम्यान कार्यकारी दंडाधिकारी आणि स्वतंत्र साक्षीदार उपस्थित ठेवण्यात आले, जेणेकरून प्रक्रिया पारदर्शक राहील.शोधमोहीमेदरम्यान काही संशयास्पद आणि गुन्हेगारी स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचा संबंध बंदी घातलेल्या संघटनांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त साहित्य तपासासाठी आणि तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, याआधीही १० मे रोजी सोपोर पोलिसांनी एका संशयित आरोपीची सुमारे २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. बांदीपोरा जिल्ह्यातील केहनुसा भागातील १० मार्ला जमीन या कारवाईत जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी माजिद अहमद सोफी उर्फ बिसाती हा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे समोर आले होते. त्याचा संबंध बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.