माले,
maldives diving accident मालदीवच्या वावू बेटावर समुद्रातील गुहांचा शोध घेत असताना झालेल्या भीषण डायव्हिंग दुर्घटनेत पाच इटालियन डायव्हर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेला मालदीवच्या इतिहासातील सर्वात मोठी डायव्हिंग दुर्घटना असे वर्णन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही डायव्हर्स सुमारे 50 मीटर खोल समुद्रातील गुहांचा शोध घेण्यासाठी गेले होते. मात्र, ते नियोजित वेळेत परत न आल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत फक्त एका डायव्हरचा मृतदेह सापडला असून उर्वरित चार जण अद्याप बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि खवळलेल्या समुद्रस्थितीमुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मृतांची ओळख मोनिका मोंटेफाल्कोन, जॉर्जिया सोमाक्ला, फेडेरिको ग्वाल्टेरी, मुरिएल ओडेनिनो आणि जियानलुका बेनेडेटी अशी करण्यात आली आहे. हे सर्व डायव्हर्स ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ नावाच्या बोटीने मोहिमेसाठी निघाले होते. यापैकी काही जण इटलीतील प्रतिष्ठित जेनोवा विद्यापीठाशी संलग्न असल्याची माहिती आहे.
मोनिका मोंटेफाल्कोन या जेनोवा विद्यापीठातील सागरी जीवशास्त्रज्ञ आणि प्राध्यापिका होत्या तसेच या मोहिमेच्या वैज्ञानिक संचालकही होत्या. त्यांची मुलगी जॉर्जिया सोमाक्ला हिलाही समुद्र आणि डायव्हिंगची आवड होती. मुरिएल ओडेनिनो या अनुभवी सागरी जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ होत्या, तर फेडेरिको ग्वाल्टेरी यांनी नुकतेच सागरी विज्ञानाचे शिक्षण पूर्ण करून डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले होते. जियानलुका बेनेडेटी हे बोट ऑपरेशन्स मॅनेजर होते आणि त्यांचा मृतदेह सर्वप्रथम सापडला.
बचाव पथकाच्या माहितीनुसार, संबंधित गुहेत अरुंद मार्गांनी जोडलेले तीन मोठे कक्ष आहेत. आतापर्यंत दोन कक्षांची तपासणी करण्यात आली आहे, मात्र खराब हवामान, कमी दृश्यमानता आणि सुरक्षित डायव्हिंग मर्यादा यामुळे शोधमोहीम वारंवार थांबवावी लागली.
शुक्रवारी आठ डायव्हर्सच्या पथकाने शोधकार्य सुरू केले होते, परंतु हवामान बिघडल्याने मोहीम थांबवण्यात आली. उर्वरित चार डायव्हर्स गुहेत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इटालियन सरकारने या प्रकरणावर लक्ष ठेवत ‘डायव्हर्स अलर्ट नेटवर्क’ या तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.maldives diving accident दरम्यान, मृत्यूंच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून अनेक शक्यता तपासल्या जात आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वाऱ्याचा वेग ताशी 25 ते 30 मैलांपर्यंत असल्याने समुद्रस्थिती अत्यंत खराब होती आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे डायव्हर्स गुहेत मार्ग चुकले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ज्ञ ऑक्सिजन टॉक्सिसिटी किंवा ऑक्सिजनअभावी घडलेल्या घटनांचाही तपास करत आहेत.
या दुर्घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हळहळ व्यक्त केली जात असून, मालदीवमधील बचावकार्य अजूनही सुरूच आहे.