पोलिसांच्या पुनर्वसन धोरणाला यश, 2025 पासून 137 नक्षलवादी मुख्य प्रवाहात
गडचिरोली,
Maoists Surrender in Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का बसला असून, तब्बल 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या पाच वरिष्ठ माओवाद्यांनी शनिवारी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये एका डीव्हीसीएम, एका पीपीसीएम, एका एसीएम पदावरील वरिष्ठ माओवादी आणि दोन सक्रिय सदस्यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली पोलिस दल आणि सीआरपीएफने राबविलेल्या प्रभावी माओवादीविरोधी मोहिमा, सातत्यपूर्ण शोध कारवाया आणि शासनाच्या पुनर्वसन योजनांमुळे अनेक जहाल माओवादी मुख्य प्रवाहात परत येत आहेत. सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा (डीव्हीसीएम), जीवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम (पीपीसीएम), रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा (एसीएम), मंगली रघु कुरसाम आणि लक्ष्मी डेंगा पुनेम यांचा समावेश आहे. या सर्वांनी अनेक वर्षे विविध दलम, प्लाटून आणि तांत्रिक पथकांमध्ये कार्यरत राहून माओवादी संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विशेष म्हणजे, आत्मसमर्पण केलेल्या मधु ऊर्फ राकेश याच्यावर महाराष्ट्र शासनाने 16 लाख, जीवन मडकाम याच्यावर 8 लाख, रजनी धुर्वा हिच्यावर 6 लाख तर मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांच्यावर प्रत्येकी 4 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळपास संपुष्टात येत असून, पूर्वी दहा उपविभागांमध्ये सक्रिय असलेले माओवादी आता केवळ भामरागडच्या सीमावर्ती भागापुरते मर्यादित राहिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे आतापर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाह स्वीकारला आहे.
Maoists Surrender in Gadchiroli .दरम्यान, 15 ऑक्टोबर 2025 रोजी माओवादी संघटनेचा केंद्रीय नेता मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू यांच्यासह 61 माओवाद्यांनी 54 शस्त्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. त्यानंतर देशभरात 1063 माओवाद्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची नोंद आहे.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामध्ये मधु वेळदा याला 8.5 लाख रुपये, तर इतर प्रत्येक माओवादी सदस्याला 5 लाख रुपयांचे पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पती-पत्नीने एकत्र आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त दीड लाख रुपये आणि गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त 4 लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद शासनाने केली आहे. या कार्यक्रमाला उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्दे
5 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
आत्मसमर्पितांवर 38 लाखांचे बक्षीस घोषित
2025 पासून 137 माओवादी मुख्य प्रवाहात
गडचिरोलीत माओवादी चळवळ शेवटच्या टप्प्यात
पुनर्वसनासाठी शासनाकडून लाखोंची आर्थिक मदत
भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर माओवादी संघटनेला मोठा फटका