राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयात नव्या टीमची एंट्री!

सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार केंद्रस्थानी

    दिनांक :16-May-2026
Total Views |
मुंबई,
New Team Enters NCP's Delhi Office राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना आता नवे वळण मिळाले असून पक्षाच्या दिल्ली कार्यालयावरून मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाचा ताबा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या प्रभावाखाली गेला असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या निकटवर्तीयांकडे कार्यालयातील कामकाजाची सूत्रे दिली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्यांच्या समर्थकांकडे दिल्ली कार्यालयातील महत्त्वाची जबाबदारी होती. मात्र अलीकडील संघटनात्मक बदलांनंतर परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आता अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागल्याची चर्चा आहे.
 
 
जय पवार
 
दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि संजय प्रजापती यांनी नुकतीच दिल्ली कार्यालयाची पाहणी केली. या भेटीदरम्यान पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा हेही उपस्थित होते. कार्यालयातील काही व्यक्तींच्या प्रवेशासंदर्भात कर्मचाऱ्यांना नव्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पक्षातील वाद आता संघटनात्मक पातळीवर पोहोचल्याचे मानले जात आहे. येत्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वीच पक्षातील जबाबदाऱ्यांच्या फेरबदलावरून राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. नव्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना अपेक्षित भूमिका न मिळाल्याची चर्चा रंगत असतानाच, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती, संघटनात्मक बदल आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षात एकमत असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अंतर्गत नाराजी आणि बदलत्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.