बुलढाणा,
Nimkhed Census देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनगणना मोहिमेची देऊळगाव राजा तालुक्यात वेगाने अंमलबजावणी सुरू असून, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी नुकतीच तालुक्यातील निमखेड येथे प्रत्यक्ष भेट देऊन चालू असलेल्या जनगणना कामाची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी गावातील विविध कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. या वेळी निमखेड येथे नियुक्त प्रगणक रंजना देशमुख या गावात नागरिकांची माहिती नोंदवण्याचे काम करत होत्या.
Nimkhed Census निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. प्रगणक देशमुख या नागरिकांकडून कशा प्रकारे माहिती संकलित करत आहेत, तसेच फॉर्म व डिजिटल प्रणालीवरील नोंदी कशा अचूक घेतल्या जात आहेत, याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. रंजना देशमुख यांनी अत्यंत कुशलतेने, जबाबदारीने व नम्रपणे नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी कव्हळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी कव्हळे यांनी सांगितले की, जनगणना हा भविष्यातील शासकीय योजना, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा पाया असल्याने एकही कुटुंब किंवा व्यक्ती या प्रक्रियेतून सुटणार नाही याची काळजी प्रगणकांनी घ्यावी. तसेच नागरिकांनीही आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना कोणतीही माहिती न लपवता अचूक व खरी माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या पाहणी दौऱ्यात त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या व निमखेड परिसरातील जनगणनेचे काम योग्य गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.