ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’: गडचिरोलीत नक्षल चळवळीला जबर हादरा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
* गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल नेटवर्क उद्ध्वस्त)
* पोलिस अभिलेखावरील सर्व नक्षली संपुष्टात आल्याचा पोलिसांचा दावा

गडचिरोली, 
Operation ‘Antim Prahar’ गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवत तब्बल आठ जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या कारवाईत दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सक्रिय सदस्यांचा समावेश असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, जिवंत काडतुसे आणि तब्बल 65 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व आरोपींवर एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
 
gd 1
 
गडचिरोली पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सात फेब्रुवारी 2026 रोजी फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका सी-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष गुप्त मोहीम सुरू केली होती. त्याच मोहिमेअंतर्गत तेलंगणा राज्यातून चार, कुमनार येथून दोन आणि नेताळा परिसरातून दोन अशा एकूण आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला. यात दोन एलएमजी रायफल, चार एके-47, चार एसएलआर रायफल, तीन इन्सास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्रांचा समावेश आहे. तसेच 358 जिवंत काडतुसे, बीजीएल लॉन्चर, डेटोनेटर, मॅगझिन आणि अन्य नक्षली साहित्यही जप्त करण्यात आले.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये राजू उर्फ मंगडू मंगळू वेको, ज्योती उर्फ अकिला उर्फ समिता पोटावी, जन्नी उर्फ नगी उंगाल येमला, जयराम मोंगे गावडे, मुकेश उर्फ लच्छू लकू अवलाम, विजय उर्फ मंगडू हुंगा तामो, रजिता उर्फ शामबत्ती कोसा मडावी आणि आमती उर्फ आयती उर्फ संध्या इडमा पोडीयाम यांचा समावेश आहे. यापैकी अनेक आरोपींवर हत्या, चकमक, शासकीय यंत्रणांवर हल्ले आणि शस्त्रसाठा प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 

prahar 
 
Operation ‘Antim Prahar’  विशेष म्हणजे, या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या अभिलेखावरील बहुतांश सक्रिय नक्षलवादी आता पकडले गेले किंवा शरण आले आहेत. कंपनी क्रमांक 10 मधील महिला नक्षलवादी मोनी मडावी हिनेही छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोलीतील सक्रिय नक्षल नेटवर्क जवळपास संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
 
या संपूर्ण मोहिमेत गडचिरोली पोलिस दलासह सीआरपीएफच्या विशेष पथकांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला. नक्षलवाद्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्रांवर मोठा हल्ला करण्यासाठी जंगलात शस्त्रसाठा लपवून ठेवला होता. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळीच कारवाई करून संभाव्य मोठा कट उधळून लावला.
 
ठळक मुद्दे
8 जहाल नक्षलवाद्यांना अटक
2 डीव्हीसीएम, 2 पीपीसीएम आणि 4 सक्रिय सदस्यांचा समावेश
51 अग्निशस्त्रे आणि शेकडो जिवंत काडतुसे जप्त
65.34 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत
आरोपींवर शासनाचे एकूण 64 लाखांचे बक्षीस
सी-60 जवानाच्या हत्येतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
गडचिरोलीतील नक्षल नेटवर्कला मोठा धक्का
संभाव्य मोठा हल्ला पोलिसांनी उधळला
ऑपरेशन अंतिम प्रहार ठरले निर्णायक
गडचिरोली पोलिसांनी सातत्याने गुप्त माहिती गोळा करून तेलंगणा, छत्तीसगड आणि गडचिरोली सीमेवरील भागात समन्वयाने मोहीम राबविली. या मोहिमेमुळे नक्षल चळवळीची आर्थिक, लष्करी आणि संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचे मानले जात आहे.