आर्णी पोलिसांची कारवाई
आर्णी,
Rescue of Minor Girls आर्णी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख यांनी विविध गंभीर गुन्ह्यांवर मोठी कारवाई केली आहे. प्रशांत देशमुख यांनी तपास कौशल्याच्या जोरावर फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या तब्बल 19 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची परिसरात मोठी चर्चा आहे.
या मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय, आर्म अॅक्ट अंतर्गत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये आरोपींना शस्त्रांसह अटक करण्यात आली. दरम्यान, एका आरोपीला अटक करून विविध पोलिस ठाणे हद्दीतील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून अनेक महत्त्वाची माहिती मिळाल्याने इतर गुन्ह्यांच्या तपासालाही गती मिळाली आहे. महिला विक्री रॅकेटचा पर्दाफाश ही या मोहिमेतील सर्वात महत्त्वाची कारवाई ठरली.
या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून आरोपींना अटक केली. परराज्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवली होती. या सोबतच चार तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
Rescue of Minor Girls एक एमपीडीए आणि तीन एनडीपीएस अंतर्गत कारवाया करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. ही कारवाई आर्णी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख यांनी पोलिस अधीक्षक कुमार चिंता व ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात केली.