पुसद न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
पुसद,
Sexual assault: Imprisonment अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आरोपीने त्याच्या घरात घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. या प्रकरणी आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोकण्याचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात आला. अल्पवयीन पीडिता स्वत:च फितूर झाल्यानंतरसुद्धा हा निकाल तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोनाली शाह यांनी शनिवार, 16 मे रोजी दिला आहे. या प्रकरणात शासनाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनीता शर्मा यांनी बाजू मांडली होती. शुभम प्रभाकर कांबळे (वय 27, कवडीपूर) असे या आरोपीचे नाव आहे.
पुसद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत राहणारा आरोपी शुभम कांबळे याने अल्पवयीन मुलीस 3 मार्च 2024 च्या रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ती तिच्या घरी बाथरूम करण्याकरिता उठून घराच्या बाहेर गेली असता तिचा हात जबरदस्तीने धरून त्याच्या घरात घेवून गेला. त्यानंतर तिला जिवाने मारण्याची धमकी देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या प्रकरणाची तक्रार पीडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून आरोपी शुभम कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
Sexual assault: Imprisonment दोषारोपपत्र तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेश राठोड यांनी दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून गजानन राठोड यांनी काम पाहिले. अल्पवयीन पीडितेला जिवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार प्रकरणात शासकीय अभियोक्ता सुनीता शर्मा यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले. महत्वाचे साक्षीदार म्हणजेच पीडिता व तिचे नातेवाईक फितूर झाले. परंतु अॅड. शर्मा यांच्या उलटतपासणीत महत्वाच्या बाबींची साक्षीदारांनी कबुली दिली. तसेच पीडितेच्या वैद्यकीय प्रमाणपत्र व रासायनिक परीक्षण आणि पंच, पोलिस व तपास अधिकाèयांनी दिलेल्या पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्या. सोनाली शाह यांनी आरोपीस पोक्सो अंतर्गत 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंड आणि भादंवि अंतर्गत 1 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.