सिरोंचा,
South Kashi Kaleshwar कालेश्वर देवस्थान येथे येत्या 21 मे ते 1 जून या कालावधीत होणार्या सरस्वती अंत्यपुष्करांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून तेलंगणा सरकारने या महासोहळ्याच्या तयारीला वेग दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले कालेश्वर हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम येथे होत असल्याची धार्मिक मान्यता असल्यामुळे या स्थळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे यंदाच्या अंत्यपुष्करांसाठी देशभरातून सुमारे 30 लाख भाविक येथे दाखल होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कालेश्वर येथे वाहणारी गोदावरी नदी तेलंगणातून प्रवाहित होते, तर महाराष्ट्राच्या सीमाभागातून येणारी प्राणहिता नदी येथे गोदावरीला मिळते. याच ठिकाणी गुप्त स्वरूपात सरस्वती नदीचा वास असल्याचा भाविकांचा दृढ विश्वास आहे. कालेश्वर मंदिरातील दोन पिंडींवर अर्पण केलेले पाणी गुप्त सरस्वतीच्या रूपाने प्रकट होते, अशी धार्मिक परंपरा आजही सांगितली जाते. त्यामुळे या त्रिवेणी संगमाला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. विशेषतः पुष्कर काळात येथे स्नान केल्यास पापक्षालन होऊन मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
सरस्वती अंत्यपुष्करांच्या तयारीसाठी तेलंगणा सरकारने तब्बल 21 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. व्हीआयपी घाट परिसरात नवीन प्लॅटफॉर्म उभारणी, संग्रहालयाचे बांधकाम, मंदिर परिसरातील सीसी रस्ते, घाटांचे सुशोभीकरण तसेच विविध मूलभूत सुविधा उभारण्याची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पोचम्मा मंदिरापासून व्हीआयपी घाटापर्यंत रस्ते दुरुस्ती आणि विस्तारीकरणाचे कामही सुरू आहे.
South Kashi Kaleshwar लाखो भाविकांच्या आगमनामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तब्बल 250 एकर क्षेत्रात भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीआयपी आणि मान्यवरांच्या आगमनासाठी स्वतंत्र हेलिपॅड तयार करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात येत आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय शिबिरे, तात्पुरते निवास, स्वच्छता व्यवस्था आणि नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहेत. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय साधून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि सीमावर्ती महाराष्ट्रातील हजारो भाविकांमध्ये या पुष्कर सोहळ्याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होणारा हा भव्य आध्यात्मिक सोहळा सीमाभागातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून कालेश्वर नगरीत भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.