होर्मुझ सामुद्रधुनी पार! एलपीजीने भरलेली दोन जहाजे भारताच्या दिशेने रवाना

    दिनांक :16-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
lpg ship left  पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी काहीसा दिलासादायक घडामोडीचा वृत्तांत समोर आला आहे. एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) वाहून नेणारी दोन मोठी टँकर जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताच्या दिशेने रवाना झाली असून त्यापैकी एक जहाज आज भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
 
 
lpg ship left
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही जहाजांमध्ये एकूण 66,392 मेट्रिक टन एलपीजीचा माल आहे. या वाहतुकीमुळे देशातील गॅस पुरवठा साखळीला मोठा दिलासा मिळणार आहे, विशेषतः अशा काळात जेव्हा पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पहिले जहाज ‘सिमी’ हे मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले एलपीजी टँकर असून ते कतारच्या रास लाफान टर्मिनलवरून सुमारे 19,965 टन एलपीजी घेऊन निघाले होते. हे जहाज 13 मे रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पार करून पुढे सरकले असून ते आज गुजरातमधील कांडला येथील दीनदयाळ बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. जहाजावर 21 कर्मचारी कार्यरत आहेत.
दुसरे जहाज ‘एनव्ही सनशाईन’ हे व्हिएतनाम ध्वजाखालील टँकर असून ते संयुक्त अरब अमिरातीतील रुवैस रिफायनरीतून सुमारे 46,427 टन एलपीजी घेऊन रवाना झाले आहे. हे जहाज 14 मे रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पार करून पुढे सरकले असून ते 18 मेपर्यंत कर्नाटकातील नवीन मंगळूर बंदरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या दोन्ही जहाजांचा माल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) साठी असल्याची माहिती आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळातही भारतासाठी ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवरून जहाजांची हालचाल सुरू आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 12 एलपीजी टँकर आणि एका कच्च्या तेलाच्या टँकरसह एकूण 13 भारतीय जहाजांनी या संवेदनशील सागरी मार्गावरून सुरक्षित प्रवास केला आहे.lpg ship left मात्र, काही अहवालांनुसार आखाती प्रदेशात सुमारे 12 भारतीय जहाजे अद्याप विविध ठिकाणी अडकलेली आहेत. याशिवाय भारतासाठी माल वाहून नेणारी काही परदेशी जहाजेही या तणावामुळे प्रभावित झाली आहेत. एकूणच, या दोन्ही एलपीजी जहाजांचा सुरक्षित प्रवास आणि भारताकडे होणारी त्यांची वेळेवर होणारी आगमन ही देशाच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी सकारात्मक आणि दिलासादायक बाब मानली जात आहे.