उज्ज्वल निकम होणार बेवारस दिव्यांगांचे वकिल

    दिनांक :16-May-2026
Total Views |
मुंबईतील काष्ठशिल्प प्रदर्शनात दिली ग्वाही
 
अचलपूर, 
Ujjwal Nikam समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या दिव्यांग बेवारस मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणार्‍या पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याला आता ज्येष्ठ विधिज्ञ व खासदार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची साथ लाभली आहे. यापुढे मी दिव्यांग बेवारस मुलांचा वकिल म्हणून काम करणार, अशी भावनिक आणि ठाम ग्वाही अ‍ॅडो. निकम यांनी मुंबई येथे दिली. मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील दिव्यांग मुलांनी स्वतःच्या हाताने साकारलेल्या अप्रतिम काष्ठशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाने उपस्थितांच्या डोळ्यांत कौतुकासोबतच संवेदनांची ओल निर्माण केली.
 
 
Ujjwal Nikam
 
Ujjwal Nikam  यावेळी बोलताना अ‍ॅडो. निकम म्हणाले की, पद्मश्री शंकरबाबा पापळकर हे दिव्यांग आणि बेवारस मुलांसाठी करीत असलेले कार्य हे केवळ सामाजिक नव्हे तर ईश्वरी कार्य आहे. या मुलांचे निरागस हास्य समाजाला माणुसकीची खरी दिशा दाखवणारे आहे. अशा मुलांना वयाच्या १८ वर्षांनंतरही बालगृहात राहण्याचा अधिकार मिळायला हवा. त्यासाठी स्वतंत्र कायदा व्हायला हवा आणि त्या लढ्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. निकम यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. दिव्यांग आणि बेवारस मुलांच्या प्रश्नांकडे शासन व समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अनिल देशमुख, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, जीएसटी खात्याचे कमिश्नर नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या हातातील कला, त्यांच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास आणि समाजाकडून मिळालेला सन्मान पाहून उपस्थित अनेक जण भारावून गेले.