वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला आर्णी-माहूर मार्गे आदिलाबादशी जोडा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
खा. प्रतिभा धानोरकर यांची मागणी

यवतमाळ, 
Wardha-Yavatmal-Nanded Railway Line विदर्भ आणि दक्षिण भारताला थेट जोडणाèया आणि मतदारसंघातील दुर्गम भागाच्या विकासाला गती देणाèया वर्धा यवतमाळ नांदेड या प्रगतीपथावर असलेल्या रेल्वे मार्गाला आर्णी मार्गे माहूर, किनवट ते आदिलाबाद रेल्वे लाईनशी जोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. या ऐतिहासिक रेल्वे जोडणीमुळे मतदारसंघातील आर्णी व परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक नागरिक, शेतकरी व भाविकांच्या प्रदीर्घ मागणीला यामुळे यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
pratibha
 
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खा. धानोरकर यांनी नमूद केले आहे की, हा प्रस्तावित रेल्वे मार्ग सुरू झाल्यास नागपूर-वर्धा भागातून थेट दक्षिण भारताकडे जाण्यासाठी एक उत्तम आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचेलच, शिवाय रेल्वेच्या मालवाहतुकीला मोठी गती मिळून महाराष्ट्र आणि तेलंगणमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होतील. खा. प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात आवर्जून नमूद केले की, हा रेल्वे मार्ग या परिसरातील अनेक जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना थेट रेल्वे नकाशावर आणणारा ठरेल.
 
 
यामध्ये प्रामुख्याने आर्णी येथील प्रसिद्ध बाबा कंबलपोश दर्गा, दाभडीचे ओंकारेश्वर मंदिर, माहूरगडावरील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री रेणुकामाता शक्तीपीठ, दत्तात्रय व अनसूयामाता मंदिर, तसेच उमरखेड परिसरातील निसर्गरम्य सहस्रकुंड धबधबा आणि पैनगंगा अभयारण्य या प्रमुख स्थळांचा समावेश आहे.
 
 
Wardha-Yavatmal-Nanded Railway Line  हा संपूर्ण परिसर रेल्वेने जोडला गेल्यास भाविक व पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढेल आणि स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा व छोट्या व्यापाèयांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आर्थिक आणि कृषी दृष्टीकोनातून, आर्णी परिसरातील प्रमुख बाजारपेठा रेल्वे नेटवर्कशी जोडल्या गेल्याने स्थानिक शेतकèयांना आपला शेतमाल अत्यंत कमी वाहतूक खर्चात नागपूर, हैदराबाद आणि आदिलाबाद सारख्या मोठ्या व्यावसायिक बाजारपेठांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे सुलभ होईल.
 
 
याशिवाय, या रेल्वे सुविधेमुळे दुर्गम व सीमावर्ती भागातील नागरिकांना नागपूर आणि हैदराबाद येथील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा तत्काळ मिळण्यास मदत होईल. प्रामुख्याने आर्णी, महागाव, माहूर व किनवट हा संपूर्ण आदिवासी व ग्रामीण पट्टा यामुळे थेट विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल, असा विश्वास खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. जनसामान्यांची निकड आणि या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे तांत्रिक व भौगोलिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन या ऐतिहासिक प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्यावी, अशी आग्रहाची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.