लखनौ,
Yogi Government Stands by Cyclone Victims उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. यात राज्यभरात १११ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे आणि वीजखांब कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले, तर सुमारे ७२ जण जखमी झाले आहेत. या भीषण परिस्थितीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री योगींनी प्रशासनाला तत्काळ कारवाईचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वितरित करण्यात आली.
राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये प्रभारी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः प्रभावित भागांचा दौरा करून बाधित कुटुंबांची भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली असून एकूण सुमारे ५ कोटी रुपयांचा मदतनिधी वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.वादळामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, तर घरांचे आणि शेतीचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून वरिष्ठ अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रभावित भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्तीग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवून त्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.