योगी सरकारचा बुलडोझर पुन्हा ॲक्शनमध्ये!

    दिनांक :16-May-2026
Total Views |
वाराणसी,
Yogi's bulldozer is back in action उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत प्रशासनाने मोठी बुलडोझर कारवाई सुरू केली असून दाल मंडी परिसरातील अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत ७० हून अधिक घरे आणि इमारती पाडण्यात आल्या असून सहा मशिदींनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दाल मंडी भागात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या विस्तारात अडथळा ठरणारी बांधकामे हटवली जात आहेत. यामध्ये काही धार्मिक स्थळांचाही समावेश असून संबंधित मशीद समित्यांना स्थलांतराची सूचना देण्यात आली आहे. लंगडे हाफिज मशीद, मार्बल मशीद, अली रझा खान मशीद, निसारान मशीद आणि शाह करीमुल्ला बेग मशीद यांसारख्या मशिदींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
Yogi
 
संभाव्य तणाव लक्षात घेता दाल मंडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. एकेकाळी पूर्वांचलातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या दाल मंडीचा चेहरामोहरा आता बदलताना दिसत आहे. प्रशासनाने या भागातील १८७ बांधकामांची नोंद केली असून त्यापैकी अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, हापूरमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अय्युब सिद्दीकी यांच्या कथित अवैध घरावरही बुलडोझर चालवण्यात आला आहे. तलावाच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले असून समाजवादी पक्षाने प्रशासनावर निवडक कारवाईचा आरोप केला आहे. विरोधी पक्ष आणि अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा सपा नेत्यांनी केला आहे. योगी सरकारकडून सुरू असलेल्या बुलडोझर मोहिमेमुळे उत्तर प्रदेशात राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगू लागल्या असून प्रशासन मात्र ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा करत आहे.