खसचा सुगंधही दरवळतो
वर्धा,
Aarti Chowk : Petrol Pump गेल्या दोन दिवसात वर्धा जिल्ह्याची देशातील सर्वाधिक तापमानामध्ये नोंद झाली आहे. रणरणत्या उन्हाने जीव अक्षरशः काहिली होत आहे. रखरखत्या उन्हात सावली आणि गारवा कुठे मिळेल असा शोध सुरू असतो. दरम्यान, आरती चौकातील पेट्रोल पंपावर ग्राहकांना दिलासा देणारी भन्नाट व्यवस्था उभी केली आहे. गार हवा देणारे मोठे पंखे, त्यातून उडणारे पाण्याचे शॉवर आणि खसच्या सुगंधाने दरवळत असल्याने वाहनात पेट्रोल टाकेस्तोवर उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळत असल्याने वाहनचालक सुखावले आहेत.
वर्धेकर भन्नाट कल्पना करण्यात कायम आघाडीवर असतात. मोठ्या शहरांमध्ये जिथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल आहेत तिथे ग्रीन नेट रस्त्यावर लावल्या जात आहे. वर्धेत मात्र सिग्नलच नसल्याने ग्रीन नेट लावण्याची गरज प्रशासनाला पडली नाही. मात्र, या उन्हात दुपारी फत महत्त्वाच्या कामानिमित्त निघणार्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात. त्यामुळे सावलीचा शोध सुरू असतो. पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरताना काही वेळ उभे रहावे लागते. त्यावेळी उन्हाचे चटके भाजून काढतात. त्यामुळे आरती चौकातील सोमानी यांनी आपल्या पेट्रोलीयम एजन्सी या पेट्रोलपंपावर स्वत:च पंख्यांची व्यवस्था केली. त्या पंख्यांतून थंड पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यात पुन्हा खस अत्तर टाकून गारव्यासोबत सुगंधही फ्री दिल्या जातो आहे.
Aarti Chowk : Petrol Pump भर दुपारी पेट्रोल भरायला आलेल्या नागरिकांना या गारवा केंद्रामुळे थोडासा का होईना, पण दिलासा मिळत आहे. तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचलेल्या वर्ध्यात ही कल्पक व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपासुन वर्धेतील तापमान ४६ अंशावर स्थिरावले आहे. पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येणार्यांना उन्हाचे चटके बसत होते. आमच्या कर्मचार्यांनाही उन्हात त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पेट्रोलपंपावर पाण्याची वाफ उडवणारे चार पंखे लावले. त्यानंतर आता त्यात खसचे अत्तरही टाकल्याने ग्राहकांसह कर्मचार्यांनाही दिलासा मिळतो आहे. आता प्रत्येक ग्राहकाला थंड पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सोमानी यांनी सांगितले