मुंबई,
bhandup-kidnapped : मुंबईतील भांडुप परिसरात एका गंभीर घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण अनैतिक संबंधाच्या संशयातून घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून संतापलेल्या कोपरकर कुटुंबाने त्या पीडित महिलेचे अपहरण केले. एवढ्यावरच न थांबता, कोपरकर कुटुंबीयांनी संबंधित महिलेला बेदम मारहाण केली आहे. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, अपहरणामागील नेमके कारण आणि सत्य परिस्थिती काय आहे याचा शोध घेतला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.